Sankrant 2019 – Aadhava


नमस्कार मंडळी ,

 आठवण सूर्याची

साठवण स्नेहाची

कणभर तीळ

मनभर प्रेम

गुळाचा गोडवा आणि स्नेह वाढवा


ह्या पंक्तीना सार्थ ठरवत ऍन आर्बर मराठी मंडळाने आपल्या दर वर्षीच्या परंपरेला साजेसा असा मकर संक्रांतीचा उत्सव ह्या वर्षी सुध्दा मोठ्या उत्साहात साजरा केला… Townsley Auditorium मध्ये झालेल्या ह्या कार्यक्रमात सजावटी पासून ते जेवणापर्यंत सगळ्याच गोष्टी अतिशयसुनियोजित होत्या आणि ह्याचं श्रेय जातं ते सगळ्या volunteers च्या अथक परिश्रमांना… मकर संक्रांत म्हणजे उत्तरायण साजरा करण्याचा सण.

मकर संक्रांत म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते पतंग, ऊस असलेली सुगडी , हळदी कुंकू , वाण ,तीळ गूळ , खिचडी आणि गुळपोळी….हे अगदी 
भारतात सहजपणेपाहायला मिळणारे दृश्य मंडळाच्या ह्या कार्यक्रमात सुद्धा पाहायला मिळाले…मकर संक्रांती हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा सण… त्याचेच प्रतीक म्हणून प्रत्येक टेबलवर स्वतःच्या हाताने केलेल्या छोट्या छोट्या बैलगाड्या आणि प्रवेशद्वाराजवळ ऊस बांधलेली सुंदर सुगडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती… . त्याच्याच बाजूलायेणाऱ्या सर्वांचे स्वागत करायला पल्लवी तायडेने रेखाटलेली सुंदर रांगोळी !

रेजिस्ट्रेशन डेस्क वर सर्वांचे हसतमुखाने स्वागत करण्याची जबाबदारी रेजिस्ट्रेशन टीम ने नेहमीप्रमाणेच अगदी उत्साहात पार पाडली. मकर संक्रांती म्हटलं की हळदी कुंकू आणि वाण ह्या समस्त स्त्री वर्गाच्या लाडक्या गोष्टी आल्याच! मग A2MM तरी ह्यात कसे मागे राहील ? ती जबाबदारी अर्चना मांढरे , शाल्मली कुलकर्णीआणि प्राचीने अगदी सहजरीत्या पेलली.दुसऱ्या बाजूला infrastructure आणि फूड टीम ची जोरदार तयारी चालू होती. कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना व्यवस्थित आणि वेळेत जेवण मिळावे म्हणून खूप आधीपासूनच हि पूर्वतयारी चालू होती. कार्यक्रम संध्याकाळी असल्यामुळे अगदी चहा आणि संध्याकाळच्या नाश्त्याची सुद्धाउत्तम सोय केलेली होती. बर्फातून गारठून आल्या आल्या लगेचच मिळालेला अतिशय सुंदर वाफाळता चहा आणि त्यासोबत चटकदार

भेळ ह्यांमुळे कार्यक्रम एन्जॉय करण्याचा मूड अजूनच वाढला.बरोबर संध्याकाळी ६ वाजता A2MM च्या युथ कमिटीने दोन्ही राष्ट्रांचे राष्ट्रगान गाऊन मुख्य कार्यक्रमाची सुरवात केली.त्यानंतर मंडळाचे नवीन प्रेसिडेंट श्री. अमित मांढरे ह्यांनी नवीन कार्यकारिणी (committee) आणि येत्या वर्षातील होणाऱ्या उपक्रमांविषयी माहितीदिली. ह्यानंतर युथ कमिटीचे प्रेसिडेंट अभिषेक मुदिराज ह्याने कमिटीतील सभासद आणि त्यांची ह्यावर्षीची उद्दिष्ट्ये ह्यांबद्दल थोडक्यात माहिती दिली . ह्या वर्षीच्या वर्षातल्या पहिल्या सोहळ्यातील उल्लेखनीय बाब म्हणजे मिशिगन मध्ये मराठी भाषेला परदेशी भाषेचा दर्जा मिळवून देणाऱ्या आपल्या मंडळाच्या माननीय सदस्या लिनीआठवले ह्यांचा “Lifetime Achievement Award” देऊन केलेला सत्कार. लिनी आठवले ह्यांनी सतत ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि त्यामुळेच मिशिगन हे अमेरिकेतील मराठी भाषेचा परदेशी भाषांमध्ये समावेश करणारे आणि त्यासाठी क्रेडिट्स देणारे पहिले राज्य ठरले आहे. संपूर्ण A2MM टीम ला आणि सगळ्या सदस्यांना अभिमान वाटावा असेच कार्य लिनी आठवले ह्यांनी केले आहे. 

ह्यानंतर सुरवात झाली ती आपल्या मुख्य कार्यक्रमाला म्हणजे अंताक्षरीला … पण ह्या कार्यक्रमाआधी A2MM चे ज्येष्ठ सदस्य श्री. अशोक देशपांडे ह्यांनी गाणे सादर करण्याची विनंती केली. ” ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेमकरावे ” हे

अतिशय सुंदर गाणे सादर करून त्यांनी आहे ते लाईफ मस्त एन्जॉय करा असा संदेश त्यातून दिला. ह्यानंतर सुरु झाली ती धमाल , मस्ती आणि चुरस !! मंडळाचे माजी प्रेसिडेंट श्री.लौकिक देशपांडे आणि टीम ने आयोजित केलेली अंताक्षरी स्पर्धा हि चार वेगवेगळ्या

फेऱ्यांमध्ये पार पडली . चार टीम्स आणि प्रत्येक टीम मध्ये चार खेळाडू अशा तब्बल १६ खेळाडूंनी ह्या स्पर्धेत भाग घेतला होता . हे वर्ष आपल्या सर्वांचे लाडके पु. ल. देशपांडे ह्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष म्हणून सगळीकडे साजरे होत आहे. A2MM ने सुद्धा पु लं च्या स्मरणार्थ टीम ची नावे व्यक्ती आणि वल्ली ह्या पुलंच्या संग्रहातीलकाही वल्लींवरून ठेवली होती. पहिले अक्षर फेरी मग शब्द फेरी त्यानंतर धून फेरी आणि त्यानंतर सगळ्यात challenging ठरली ती विडिओ फेरी. मेधा आणि पियुष करकरे आणि मिलिंद कुलकर्णी आणि गौरव कुलकर्णी ह्यांच्या खुमासदार निवेदनशैलीने स्पर्धेत अजूनच रंगत आणली. सखाराम गटणे , अंतू बर्वा , रावसाहेब आणि चितळे मास्तर ह्यांपैकी सखाराम गटणे टीम ने विजेतेपद पटकावले तर अंतू बर्वाने दुसरे स्थान पटकावले. हि स्पर्धा फक्त भाग घेतलेल्या लोकांसाठी नव्हती तर संपूर्ण प्रेक्षकवर्गाला सुद्धा “बटाट्याची चाळ “टीम म्हणून सहभागी करून घेण्यात आले होते. ही स्पर्धा ऑडिटोरियम मध्ये चालू असतानाच 
आपल्या youth मेंबर्ससाठी बाहेर guess the song आणि छोट्यांसाठी kite मेकिंग चे आयोजन केले होते. आपल्या मंडळाच्या लहान सभासदांनी त्यांचे कलाकौशल्य अगदी पणाला लावून छान छान पतंग बनवले..
अंताक्षरी स्पर्धा पार पडल्यानंतर बाहेरून येणाऱ्या खमंग वासाने सर्वांचीच भूकचाळवली. खमंग गुळपोळी , कोशिंबीर , चटणी आणिमस्त पाव भाजी असा अत्यंत चविष्ट 
मेनू असल्यामुळे सगळ्यांनी जेवणावर मस्त ताव मारला. जेवण चालू असतानाच आपल्या मंडळाच्या युथ कमिटीने नवीन सदस्यांना आजच्या कार्यक्रमाविषयी 
त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला .. ह्या संपूर्ण कार्यक्रम त्यांना कसा वाटला काही सुधारणा आवश्यक आहेत का ह्याविषयी प्रेक्षकांची
मते जाणून घेण्यात आली. आपल्या यूथ कमिटीने त्याचा एक छोटासा विडिओ पण केला 
आहे. तो तुम्ही सर्वानी अवश्य पहा (face book page) …

Best Regards,
-A2MM Committee

Attachments