Diwali 2018 – Adhava


Diwali 2018!

IMG_7053
IMG_7053

ऍन आर्बर मंडळाच्या अंगणात, आली कशाने नव्हाळी,
उभी प्रकाशाच्या पावलांनी दारात दिवाळी,
थोडं आपल्याकडंच टाकू तिच्या पदरात,
मोठ्या आनंदाने सगळ्यांनीं मिळून म्हणू घे घे उजेडाची वात ….. घे घे उजेडाची वात !

यंदाची दिवाळी मंद पदन्यास करीत आली आणि लहान-मोठ्या सगळ्यांचा आनंद द्विगुणित करून थाटामाटात मोठ्या आनंदाने साजरी होऊन गेली .

तर मंडळी, जवळजवळ दीड-दोन महिने आधीच दिवाळीच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागलेल्या सगळ्याच कार्यकर्त्या मंडळींच्या उत्साहाला उधाण येतं, त्यात नवनवीन कल्पनांची, योजनांची, अगदी सढळ हस्ते भर पडते आणि ऍन आर्बर मंडळात साजरा होणारा प्रत्येक सण, कार्यक्रम हा सगळ्याच मंडळींच्या मनात ऋणानुबंधाच्या गाठी कायमच्या, अगदी घट्ट – पक्क्या बांधून जातो ..
कार्यक्रमाची तारीख, वेळ, जागा ठरते आणि मग सुरुवात होते ती, रेश्मा उपासनी आणि प्राची सहत्रबुद्धेच्या छानश्या, साजेश्या रंग-संगतीच्या व मधुरा मराठे आणि सपना कुलकर्णीने मनःपूर्वक पाठविलेल्या आमंत्रणाने .. तोपर्यंत सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन एकीकडे यशस्वीरीत्या हळुहळू आकारतं … आणि प्रोग्रॅम मॅनेजर – अर्चना मुदीराज मोठ्या सफाईने, अगदी सहजपणे विनासायास हसत-खेळत सगळ्याच लहान-मोठ्या, सिनिअर्स मंडळींची मर्जी राखते …. आणि पुन्हा एकवार लौकिक – युगंधरा यांच्यासह केतकी लिमये, चिन्मय तोफखाने आणि अक्षय कुलकर्णी म्हणजे आपल्या A२mm ची टीम, बाजी मारते!!

यंदाच्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी, Towsley Auditorium – Saline Ann Arbor येथे सगळ्या मंडळींनी, दिवाळी अगदी पारंपरिक पद्धतीने साजारी केली. रजिस्ट्रेशन डेस्कवर माधुरी, पल्लवी, लीनी, नीलम आणि सपना ह्या सगळ्यांनी पाहुण्यांचे स्वागत करून, उपस्थितांच्या नोंदणीचं काम करून पुढल्या वर्षीच्या मेम्बरशीपची (Early bird’s discounts) ची तरतूद करून सगळ्यांची माहिती (Contact Information) गोळा केली, जेणेकरून नवीन लाभार्थींना A२mm च्या कुटुंबात सामील करून घेऊन, ह्या मंडळाच्या सगळ्या कार्यक्रमांत आवर्जून सक्रिय भाग घेता येणं, सहज शक्य होईल. युथ कमिटी, डेकोरेशन कमिटी, Infrastructure टीम आणि रांगोळी टीम, नेहेमीच आपल्या कलागुणांच्या प्रदर्शनाने आपल्या पाठीवरची “शाबासकीची थाप ” मोठया दिमाखात, वसूल केल्याखेरीज रहात नाहीत.

मग चौकस विचारांची शंकरपाळी, ऐक्याने एकवटलेला बेसनाचा लाडू आणि गोडाबरोबर तिखटाची पण बाजू सांभाळून, वेगळीच लज्जत वाढविणारा चिवडा – असा हा मस्तपैकी खास घरगुती फराळाचा आस्वाद घेत आणि मस्त गरमागरम चहा – कॉफी झाल्यावर, सगळी मंडळी नाट्यगृहाकडे (Auditorium) वळली. मला अजूनही आठवतं की लहानपणी गणपती, दसरा, दिवाळी कुठलाही सण असो, सगळे नातेवाईक आवर्जून भेटायचे. एकत्र गोळा होऊन कुटुंबातल्या एखाद्या मोठ्या मावशी, आत्या, काकूंच्या मार्गदर्शनाखाली मोठं मोठाली पातेली भरून खमंग भाजलेल्या रवा -बेसनाचा घमघमाट सुटायचा. तसंच काहीसं इकडे इतकी वर्ष अमेरिकेत राहून अनुभवायला मिळालं. तीच धांदल, गडबड. आणि पदर खोचून तयार असलेल्या दीप्तीकाकी शारंगपाणी, पद्मा काकी नायर ह्या दोन veteran बॅट्समन च्या खंबीर नेतृत्वाखाली, ऍन आर्बरच्या लेकी-सुना पाककलेत पारंगत होत आहेत. उमा कानडे, स्वाती कुलकर्णी, रूता सिंग,उमा विसइ, अंजु पटवर्धन, मेधा करकरे, श्रुती संदभोर यांच्या सारख्या ताज्या दमाच्या फलंदाज सुमडीत चौकार, षटकार मारून आपल्या पाककौशल्याने सगळ्यांना मिटक्या मारत, हाताची बोटे चाटायला भाग पाडतात. असो .

आपल्या चिमुकल्या पाहुण्यांना “दिवाळी” ह्या सणाची तोंड-ओळख व्हावी आणि जास्तीतजास्त प्रकारे मुलांना आपल्या सणासुदीची वैशिष्ट्ये लक्षात येऊन, त्याच महत्व कळावं, ह्या उद्द्येशाने एक “चित्रकला” स्पर्धा आयोजण्यात आली होती. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांनी ह्या चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि आपल्या बालसुलभ कलाविष्काराने, स्पर्धेतील छान छान
बक्षिसे देखील पटकाविली.

बाल कलाकारांच्या अमेरिकन आणि भारतीय राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सुरवात झाली. आनंद शारंगपाणी यांनी (B.O.T) च्या वतीने सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व कार्यकारिणीचा थोडक्यात आढावा घेतला. BMM चे अध्यक्ष श्री. राणे यांनी सगळ्यांना BMM-२०१९ साठी आमंत्रित केलं. डॉ. नितीन चौथाई, हे Neonatal Intensive Care Unit Detroit इथे कार्यरत असून Assistant Professor Of Pediatrics – Wayne State University मध्ये सेवेत रुजू आहेत. गेली ४ वर्षे त्यांच्या “पालव” ह्या संस्थेद्वारे भारतातील त्याचप्रमाणे इतर देशातही गरजु नवजात बालकांना वैद्यकीय उपकरणे (ventilators) पुरवली आहेत, जेणेकरून आतापर्यंत शेकडो गरीब मुलांचे प्राण वाचले आहेत आणि विशेषतः ग्रामीण, अविकसित भागात, ह्या मुलांना Lungs Treatment देणं सोयीचं झालं आहे. त्यांच्या ह्या मौलिक समाजकार्यात आपल्या मंडळाचे अनेक कार्यकर्ते अगदी मनापासून, आपल्या ताकदीनुसार हातभार लावतात. काही कलाकार मंडळी आपल्या नृत्य-गायन कलेच्या आधारे ह्या संस्थेशी निगडित आहेत. त्याबद्दल त्या सर्व कार्यकत्यांचे मन:पूर्वक आभार आणि अश्याच प्रकारे ह्या समाजकार्यास, यथाशक्ती – सदैव हातभार लागत राहो ही शुभेच्छा. डॉ. चौथाई यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दल माहिती दिली व सहकार्यासाठी आवाहन केलं.

Ram Tuzi Sita Mauli

आता ह्या संध्याकाळचे विशेष आकर्षण म्हणजे धमाल विनोदी नाटक – “राम तुझी सीता माउली”!
यावेळी दिवाळीसाठी स्थानिक कलाकारांनी प्रस्तुत केलेलं पूनम तोरगल आणि आशिष जोग ह्या जोडगोळीद्वारा निर्मित आणि दिग्दर्शित, भूमिका प्रस्तुत दोन अंकी तुफान विनोदी नाटक “राम तुझी सीता माउली” प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं. उपस्थित असलेल्या सगळ्याच लहान – मोठ्या मंडळींना अगदी पोट दुखेपर्यंत हसविल्याचे श्रेय, पूर्णतः: ह्या स्थानिक, हौशी कलाकारांनाच द्यावं लागेल. २१ व्या शतकातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे, कालचक्राच्या साहाय्याने पुरातन काळच्या रामायणात, फेरफटका मारून साक्षात रामायणातील सगळ्याच अवतारांना भेटण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा, आणि त्यातून झालेली वैचारिक गुंतागुंत आणि त्यातूनच उद्भवलेले हास्याचे, विनोदाचे फवारे …. असा ह्या विनोदी नाटकाचा हा हलका-फुलका विषय.

सतीश सुब्रमणियन यांची लखलखीत प्रकाश योजना आणि अभिजय काणे यांचे संगीत संयोजन, त्याचप्रमाणे विनीत सहस्रबुद्धे यांच्या ध्वनी संयोजनामुळे मुळे हा नाट्यप्रयोग विशेष खुलला. प्राची वेसीकर यांच्या नृत्य दिग्दर्शनाने आणि अनुप बापट, लौकिक देशपांडे, श्रुती पारखी, यशोधन जोशी आणि स्वाती सुर्डी यांच्या सुरेल पार्श्वगायनाने नाटकाची गोडी आणखीनच वाढली. तर रंगभूषा आणि वेशभूषेची
चोखंदळ जबाबदारी सुधा गाडगीळ व पूनम तोरगल यांनी सक्षम रित्या पार पडली. त्याचप्रमाणे नेपथ्य व रंगमंच व्यवस्था आशिष जोग, नीलांजन जोशी, अजय मुरगोड, वैभव अरगडे, अभय भिवरे यांनी सांभाळली. जयंत मणेरीकर यांनी छायाचित्रीकरणास हातभार लावला. प्रदीप कोकाटे व स्मिता जोशी आणि स्पॉट लाईट डिझाइन्स यांचे विशेष आभार.
सतीश डोंगरे, पूनम तोरगल, आशिष जोग, मिलिंद कुलकर्णी, प्राजक्ता कुलकर्णी, गौरव कुलकर्णी, विक्रांत पटवर्धन, सुयश शिंत्रे, सुरेश नायर, प्राची सहत्रबुद्धे , अर्चना मुदिराज, सायली कुलकर्णी, युगंधरा देशपांडे, दीपाली बोरा, प्रसाद वेसीकर अश्या अनेक – त्यापैकी काही नवोदित, तर काही अनुभवी कलाकारांनी एकमेकांना, सुरेल साथ देऊन, प्रेक्षकांची शाबासकी पटकावली.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पात्रांची निवड करून, अत्यंत मेहनतीने ह्या सगळ्या कलाकार मंडळींसह एक आगळा -वेगळा असा विनोदी विषय हाताळून , लहानांपासून ते पार मोठ्या वयोगटातील सर्वच प्रेक्षकांना, सुरुवाती पासून ते अगदी शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवल्याचं संपूर्ण श्रेय – पूनम तोरगल आणि आशिष आशिष जोग आणि त्यांच्या सगळ्या युनिटला जातं … यात अजिबात शंका नाही !

विनोदी नाटकाचा, यथेच्छ आनंद लुटून, मंडळी प्रसन्न, अगदी खुश होऊन जेवणाकडे वळली. मस्तपैकी पनीर मसाला, चिकन करी, रायता, पोळ्या, भात, डाळ-फ्राय, गुलाबजाम यांवर ताव मारून मंडळी तृप्त झाली. तोपर्यंत एकीकडॆ फटाक्यांच्या अतिशबाजीची सोय अजित कुलकर्णी यांनी केली होतीच. मग सगळी कच्ची-बच्ची, मोठ्या उत्साहाने आणि हुशारीने, आपल्या पालकांच्या आणि त्याचप्रमाणे मंडळातल्या हक्काच्या मोठ्या दादा – काका – मामाच्या सहकार्याने फटाके उडवायला पुढे सरसावली. पेटलेल्या वाती, जळत्या फटक्यांचा तो वर्षानुवर्षे अनुभवलेला वास, नकळत भारतातल्या आपल्या घरी घेऊन गेला, आणि हलकेच फेरफटका मारून, परत अमेरिकेत कधी घेऊन आला? हे, त्या आनंदी, उल्हसित वातावरणांत कळलं देखील नाही आणि अगदी अलगद, हळुवारपणे भारतातल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला ..

संक्रांतीचा तिळगुळ, गणपती बाप्पाला मोदक आणि ढोल-ताशा आणि दिवाळीला फराळ ….त्याचप्रमाणे A२mm च्या प्रत्येक कार्यक्रमानंतर चा “अमिताभ मुदीराज” चा bollywood डान्स झाला नाही ..तर काय मजा? कार्यक्रमाची पूर्तता होणंच शक्य नाही .. हे आता समीकरण ठरलेलंच आहे.. नाही का? सगळ्यांनी अमिताभ-अर्चनाच्या सह फेर धरला आणि मंडळी नाचात दंगली. असो .

गेल्या पूर्ण वर्षात, ह्या आढावा लेखनामुळे, तुमच्या सगळ्याशी मनमुराद गप्पा मारता आल्या, नव्या-जुन्या आठवणी तुमच्यासोबत वाटता आल्या …नवनवीन ओळखी झाल्या ..जुन्या मैत्रीच्या नात्यांचे अजून घट्ट मैत्रीच्या धाग्यात रूपांतर झाले… ह्या काळात, जर अनवधानाने काही चुकलं असेल तर क्षमस्व.

तर मंडळी, आपली ही दृढ मैत्री दिवसेंदिवस अशीच बहरत राहो ..लोभ आहेच, तो अजून उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा …

सरोज जावकर

Saroj Prashant Javkar
communications@A2MM.ORG

Marketing Team