तो राजहंस एक…..! 1


Amitabh Bachhan

This story depicts an unconditional love expressed by a physically, mentally challenged young man when superstar Mr. Amitabh Bachchan was injured while filming an action sequence. The legend, Amitabh Bachchan wrote that “I was about to die but your prayers kept me alive”, 35 Years after Coolie Accident, as he was declared clinically dead for a few minutes, caused due to an internal abdominal injury.
Well …In this journey of life, down the road, some personalities, some incidents make life long impressions and give you a true sense of “self-realization”!

तो राजहंस एक…..!

पिढ्यानपिढ्या सिनेसृष्टीवर आपलं साम्राज्य गाजविणारा, लाखो-करोडोंके “दिलोंकी धडकन”.. Angry Young Man, माझ्या आठवणीतला, बॉलिवूडचा शहेनशहा, एक “राजहंस” .. One and only … फिल्मस्टार, सुपरस्टार – the legend “अमिताभ हरिवंशराय बच्चन”! गेल्या वर्षी आभाळभर शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारत,अमितजींच्या
पंचाहत्तरीचे Twitter messages, Social Media, You Tube वर जणू सर्वत्र धुमाकूळच घालत होते. आणि त्यातला “कुली” सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी मिळालेल्या जीवनदानाचा आवर्जून केलेला विशेष उल्लेख! … अगणित चाहत्यांच्या अपरिमित प्रार्थनांना, तेव्हा यश आलं आणि या यशात खारुताईचा का होईना, पण नक्कीच वाटा होता तो आमच्या घन:श्यामचा …अर्थात हे सगळं TV वर बघितलं आणि घनाची खूप प्रकर्षाने आठवण झाली आणि मन पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणींत हरवलं ….
मुंबईत असतांना, आमच्या जवळच्याच एका बिल्डिंगमध्ये मध्ये एक फ्लॅट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असे. घन:श्यामचे वडील उच्चशिक्षित असून सरकारी नोकरीत खूप मोठ्या पदावर नियंत्रित होते. कामानिमित्त त्यांची मुंबईला बदली झाल्याने, आपल्या कुटुंबियांसमवेत काही वर्ष तो आपल्या वडिलांबरोबर आणि इतर भावंडांबरोबर तिथे राहायला आला होता. घन:श्यामला सगळेजणं प्रेमाने “घना” म्हणत असत. लहानपणीच आई देवाघरी गेलेली आणि त्याची इतर भावंडे देखील मेडिकल-इंजिनियरिंगच्या उच्च शिक्षणात, आपआपल्या विश्वात कायम व्यस्त असायची. फारसा वेळ नसायचा कोणाकडे त्याच्यासाठी. आमच्यापैकी कोणी त्याच्याशी बोललं, किंवा अगत्याने त्याची विचारपूस केली, की घनाच्या चेहऱ्यावरचा विलक्षण आनंद ओसंडत असे. इतर अभ्यासू भावंडांसारखीच घनाला देखील लिहायची, वाचायची, टीव्ही बघायची मनस्वी आवड होती. अगदी नियमितपणे, अत्यंत उत्साहाने तो दररोज त्याच्या स्पेशल शाळेत जात असे. आणि खास बात म्हणजे हे “घनासाहेब ” म्हणजे ज्येष्ठ अभिनेते -“अमिताभ बच्चन” यांचे जबरदस्त फॅन.. T.V वर चित्रहार मध्ये “सत्ते पे सत्ता”, “डॉन” किंवा “नमक हलाल” मधलं पग घुंगरू बांध मीरा नाची रे .. इ. गाणी लागली, की घना एकदम मनापासून आनंदून, सुखावून जायचा. असो.

आज घना खूपच खूश होता. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. अतिशय जल्लोषाने, अगदी बेभान होऊन हातात एक पत्र – सफेद रंगाचा लखोटा घेऊन सैरावैरा पळत होता. एकीकडे तोंडातून लाळ गळत होती आणि जेमतेम कंबरेवरच्या पट्ट्यात लटकवलेली पँट सुद्धा कधीही गळून पडायच्या तयारीत. तर एका पायातली चप्पल देखील जवळजवळ हरवल्यातच जमा. त्याच्या मागून त्याची पत्नी, त्याला आवरायच्या निष्फळ पण अतोनात प्रयत्नांत. अहो घना थांबा .. अहो घना थांबा … पण घनाला कुठे वेळ होता तिच्याकडे बघायला..? आणि आपली गळणारी लाळ तिच्याकडून पुसून घ्यायला ….? आणि फारसं विशेष काही सोयरसुतक देखील नव्हतं त्याला त्याचं .. महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय सुसंकृत, सुशिक्षित अश्या उच्चभ्रू परिवाराचा हा एक सदस्य. पण लहानपणी पोलियोने पिडीत. मेंदूची पूर्णपणे वाढ न झाल्याने, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य विस्कळीत असलेला विशीतला हा एक मतिमंद तरुण. हाता-पायाची बोटे वाकडी झालेली..कधी भावनांचा उद्रेक झाल्यास, मानसिक संतुलन बिघडून, आपल्या रागावरचं नियंत्रण पूर्णतः हरवून बसणारं, त्या सुसंकृत, सुशिक्षित तळ्यातलं एक कुरूप, वेडं, विकलांग पिल्लू …”घन:श्याम” उर्फ “घना”!

मला अजुननही चांगलं आठवतंय, मी शाळेत पाचवी/सहावीत असतानाची ही गोष्ट …. २६जुलै १९८२ च्या संध्याकाळी, सुप्रसिद्ध सिनेस्टार अमिताभ बच्चन यांची “कुली” सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी झालेल्या अपघाताची दुर्दैवी बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली. ह्या चित्रपटासाठी, एक फाइट सीन करत असताना सह-कलाकार पुनीत इस्सार यांनी ढकलेल्या टेबलचा कोपरा, अमितजींनी मारलेल्या उडीचा वेळेचा अंदाज चुकल्याने, अनपेक्षितपणे पोटावर येऊन आदळल्याने अमिताभ बच्चन यांना पोटांत जबरदस्त दुखापत झाली. आणि ते गंभीररीत्या जखमी झाले…. आणि सगळी चित्रपटसृष्टी एकाएकी आपल्या चहित्या, लाडक्या कलाकाराच्या – अमितजींच्या काळजीने शोकसागरांत पार बुडून गेली. ह्या अनपेक्षित अपघाताने सगळ्या प्रोड्यूसर्स, डायरेक्टर्स यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती जणू. अमिताभजीं चा जबरदस्त फॅन असलेला आमचा बिचारा घना सुद्धा पार हादरून गेला. दुःख, राग, काळजी सगळ्या संमिश्र भावनांना पूर आला … आणि पुन्हा एकदा, फ्रीज मधल्या काचेच्या बाटल्या फेकल्याचा आवाज, घरातल्या वस्तू उधळलेल्या, किंकाळ्या, आरडाओरडा …..आणि घरभर काचांचा सडा !
परत दुसरा दिवस.. आणि ह्या ज्वालामुखी सारख्या उफाळणाऱ्या भावनांचा उनपावसाळी पाठशिवणीचा खेळ असा चालूच राहिला. एक एक दिवस जात होता. संपूर्ण सिनेसृष्टी, अमितजींच जगभर पसरलेले फॅन्स दिवसरात्र पूजा-अर्चा, व्रत-वैकल्यात मग्न होते, आपल्या लाडक्या कलाकारासाठी मनोभावे देवाकडे साकडं घालू लागले होते. ट्रक ने भरभरून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन, मुंबईच्या सिद्धिविनायकाला, नवस आणि गाऱ्हाणी घालू लागल्या. पण हे सगळं बिचाऱ्या घनाच्या आवाक्याबाहेरचं होत किंबहुना त्याला कदापि शक्यच नव्हतं…. पण आपणही अमितजींसाठी काहीतरी करावं, असं त्याला राहून राहून वाटत होतं. पुन्हा एकदा हताश, दुःखी, भावनावश झालेल्या घनाला परिस्थितीशी हार मानणं मंजूर नव्हतं. शेवटी त्याने मनाशी पक्का निर्धार करून आपल्या वडिलांच्या मदतीने, पत्राद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आपल्या मोडक्या तोडक्या अक्षरात एक छानसं पत्र सुपरस्टार “अमिताभ बच्चन” – अमितजींना पाठवलं. तुमची तब्येत लवकरात लवकर बरी होवो, यासाठी देवाकडे मी अहोरात्र प्रार्थना करीत आहे. आपण लवकरच पूर्ण बरे व्हाल असा माझा ठाम विश्वास आहे, अश्या आशयाचं ते पत्रं होतं. त्यात अमितजींचे कुठले सिनेमे त्याला नक्की का आवडतात? हे ही कळवायला घना अजिबात विसरला नव्हता ..एकंदरीत आपल्या लाडक्या, जीवाभावाच्या कलावंताच्या उदंड आयुष्यासाठी, आरोग्य-स्वाथ्यासाठी, देवाकडे तन-मन-धन अर्पण करुन,अगदी मनापासून जीवनदानाची याचना केली होती.. आणि आपल्या शारीरिक-मानसिक अडचणींवर मात करुन, त्या लाखमोलाच्या भावना, ब्रीच कँडीहॉस्पिटल मधल्या ICU वॉर्डमध्ये काही काळ मृत्यूशी झुंजत असलेल्या, त्याच्या लाडक्या अमितजीं पर्यंत पोहोचविल्या ….

जवळजवळ सहा-आठ महिने सहज उलटले असतील ह्या पत्र व्यवहाराला. एव्हाना अमितजींची तब्येत पूर्णतः सुधारली होती. प्रकृतीचा संभाव्य धोका पूर्णपणे टाळला होता. हळुहळू सगळ्यांच्या नजरा, अमितजींच्या चित्रपटसृष्टीतल्या पुनरागमनाकडे लागल्या होत्या. आणि त्याच दरम्यान घनाच्या नावे घरी आलेलं पत्रं त्याच्या हातात पडलं! विश्वासच बसत नव्हता त्याचा, स्वतःच्या डोळ्यांवर…. चक्क अमितजींनी उत्तर पाठवलं होतं , घनाच्या पत्राचं…..! खूप मनापासून आभार व्यक्त केले होते त्यांनी घनाचे. आज मला तुमच्या निर्व्याज प्रेमाने, मौलिक प्रार्थनांमुळेच साक्षात जीवनदान मिळाल्याचा त्यात स्वच्छ उल्लेख होता. आणि त्यासाठी मी तुमचा आजन्म ऋणी राहीन असं लिहिलं होतं. आणि आठवण म्हणून सदिच्छा भेट – त्यांचा एक छानसा रंगीत पोस्टकार्डसाइज फोटो autograph सहित पाठवला होता. स्वर्ग दोन बोटं उरला होता….घनाच्या आनंदाला सीमा नव्हती आज ..!

तसं बघायला गेलं तर जेव्हा हिंदी, मराठी नाटकं -सिनेमे समजायला लागले तेव्हापासून आम्ही पण खूप बढाया मारायचो आणि स्वतःला मोठे फॅन समजायचो “अमिताभ बच्चन”चे ….पण ह्या प्रत्यक्ष घडलेल्या अनुभवावरून जाणीव झाली की …. जेव्हा आपली एखादी पडद्यावरची लाडकी व्यक्ती, मृत्यूच्या दारात झुंजत असते… तेव्हा काय करतो आपण त्या आवडत्या व्यक्तीसाठी ? ….थोडीशी शाब्दिक हळहळ, काही क्षणैक अश्रू ? आपल्या पैकी कितीजण आपला कामधंदा थोडा वेळ बाजूला ठेवून, लगेच कागद-पेन उचलून, आपल्या सहृदय भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची तसदी घेतात?…… नेहमीच भेडसावणारा हा एक साधा-सोपा पण सोयीस्कर रित्या दुर्लक्षित केला जाणारा असा हा प्रश्न….!

काही प्रमाणात, समाजाने उपेक्षिलेला, वेळोवेळी आपल्या भावनांचा उद्रेक होऊन देखील आपल्या हृदयाच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात, आपल्या श्रद्धास्थानांबद्दल विशेष प्रेम, आदर बाळगणारा अमिताभजींचा हा एक मनमौजी चाहता. आपल्या लाडक्या अभिनेत्यावर जीवापाड प्रेम करणारा, एक विकलांग, मंदबुद्धी तरुण …सगळ्या भावंडांपासून खूप खूप वेगळा …माझ्या बालपणीच्या आठवणीतला ..आणि त्यासुसंकृत, सुशिक्षित तळ्यातला ……. तो राजहंस एक – “घन:श्याम” उर्फ “घना”!
IMG_7053

Saroj Prashant Javkar
A2MM Marketing Team
Communications@a2mm.org


Leave a comment

One thought on “तो राजहंस एक…..!