Lifetime Achievement Award


Namaskar Mandali,

प्राची (लिनी ) आठवले ह्यांना ऍन आर्बर मराठी मंडळाकडून “लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड”

आपल्या महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर अमेरिकेत आल्यावर आपली मराठी माणसं बघून प्रत्येकालाच खूप हायसे वाटते आणि इतक्या दूर पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण आपल्या मराठी संस्कृतीशी जोडलेले आहोत हे बघून इथे येणाऱ्या प्रत्येकालाच समाधान वाटते. परंतु इथे जन्मलेल्या आणि इथेच शिकणाऱ्या मुलांना घरच्या मराठी वातावरणाशिवाय बाहेर कुठेच मराठी बोलण्याची संधी मिळत नाही त्यामुळे ते मराठी बोलताना अडखळतात आणि मराठी बोलण्याचे टाळतात. हि गोष्ट आपल्या मंडळातील तेव्हाच्या अध्यक्षा लिनी आठवले ह्यांना प्रकर्षाने लक्षात आली आणि एक प्रवास सुरु झाला तो मराठी शाळेकडे…आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने २०१४ साली लिनी आठवले ह्यांनी मराठी शाळा सुरु केली.. अगदी पहिल्याच वर्षी त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. भारती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेला अभ्यासक्रम ह्या मराठी शाळेमध्ये शिकवला जाऊ लागला त्यामुळे मुले अगदी सहजरीत्या मराठी बोलायला शिकली. नुसतीच शिकली नाहीत तर त्यावर आधारित कार्यक्रम पण करू लागले. लिनी आठवले फक्त मराठी शाळा सुरु करून थांबल्या नाहीत. त्यानंतर त्यांचे प्रयत्न सुरु झाले ते मराठी ला येथील अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी.
येथील बहुतांश राज्यात विद्यार्थ्यांना ९वी ते १२वी मध्ये एक परदेशी भाषा शिकावी लागते आणि त्यासाठी त्यांना क्रेडिट (मार्क्स ) पण मिळतं. ह्या परदेशी भाषांमध्ये येथे मुख्यत्वेकरून युरोपियन भाषांचा जास्त पगडा दिसतो. त्यामुळे मराठी भाषेला जर हा दर्जा मिळाला तर आपल्या मुलांना त्याचं क्रेडिट पण मिळेल आणि मुले अजून उत्साहाने मराठी भाषा शिकतील ह्या उद्देशाने लिनी ह्यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.

मराठी भाषेला विदेशी भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी लिनी आठवले ह्यांनी २ वर्षे अथक प्रयत्न केले. मराठी शाळा विदेशी भाषेसाठी असणारा अभ्यासक्रम कसा पूर्ण करतात हे पटवून देण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. जेव्हा वेगवेगळ्या शाळांमधून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांनी सरळ मिशिगन राज्याच्या शिक्षणखात्याकडे धाव घेतली. तेथे मात्र त्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. इतकंच नाही तर “सील ऑफ बायलीटरसी”चा शिक्का पण मराठी शिकणाऱ्या मुलांच्या १२वि च्या प्रशस्तिपत्रकात मिळवून दिले. सील ऑफ बायलीटरसी म्हणजे केवळ भाषा येणे इतके नसून तुम्हाला त्या भाषेशी निगडित संस्कृतीची ओळख असणं आणि त्याचा अभ्यास असणं सुद्धा आवश्यक असतं.

लिनी आठवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे मराठी भाषेला मिशिगन मध्ये विदेशी भाषेचा दर्जा मिळाला. इथे असलेल्या सर्वच मराठी लोकांसाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे.

लिनी आठवले ह्यांच्या ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ऍन आर्बर मराठी मंडळाने मकर संक्रांतीच्या कार्यक्रमात मंडळाचे संस्थापक श्री. भूषण कुलकर्णी ह्यांच्या हस्ते त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित केले.Best Regards,
A2MM Committee

Attachments