Gudhi Padawa 2018 – Adhava


 
 
 
नमस्कार मंडळी,

       IMG_7053 पुन्हा एकदा, आपल्या सर्वांचं Ann Arbor Marathi Mandal – A2MM परिवारात मन:पूर्वक सहर्ष स्वागत! बघतां बघतां ह्या वर्षातील दुसऱ्या कार्यक्रमाचा “आँखो देखा हाल” आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येतांना, आम्हा सर्वांना अतिशय आनंद होत आहे.

Harvest Elementary, Saline, Ann Arbor इथे 24th मार्च ला हिंदु पारंपारिक पद्धतीने मराठी नूतन वर्ष – “गुढी पाडवा” अगदी मोठ्या उत्साहाने, एका आगळ्यावेगळ्या धमाल मस्तीत साजरा झाला. सर्वप्रथम आरोग्य(लिंब फाटा), मांगल्य(पुष्पहार), माधुर्य(साखर गाठी), वैभव(जरीसाडी), सामर्थ्य (वेळू काठी), संकल्प(सुपारी), सौभाग्य (हळदी-कुंकू), स्थैर्य(पाट) आणि सिद्धी (श्रीफळ) चं प्रतीक असलेली “गुढी” उभारून मनोभावे पूजा झाली. यावर्षी मंडळात प्रथमच, रेश्मा उपासनींनी स्वत: घरी बनविलेल्या,आकारलेल्या खास “घरगुती” साखरगाठींनी पाडव्याचा आनंद द्विगुणित झाला. कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या उत्सहाने,आनंदाने झाली. ह्या संध्याकाळचे एक विशेष आकर्षण होतं आणि ते म्हणजे “मधली सुट्टी”.

बालपणीचा काळ सुखाचा …! आपल्या सगळ्यांना चांगलच आठवत असेल, लहानपणी शाळा सुरु झाली कि आपण सगळेजण अगदी चातका सारखी मधल्या सुट्टीची वाट पाहायचो ..आणि एकदा का मधल्या सुट्टीची घंटा वाजली, कि जाम धूम ठोकायचो. शाळेच्या पटांगणात कबड्डी, खो-खो, लंगडी, तीन पायांची शर्यत, चमचा लिंबू, विषांमृत ह्या सारख्या सगळ्याच मैदानी खेळांना विशेष उत यायचा. तसंच काहीसं इथंही बघायलाच नाही तर प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं! सगळेच जण आपलं वय, देहभान विसरून, मुलांत मुल होऊन, ह्या खेळांत अगदी दंगून गेलें. प्रोग्रॅम मॅनेजर अमित उपासनींच्या खंबीर नेतृत्वाखाली सर्वच कार्यकर्त्यांनी, लहान-मोठ्या, चिल्यापिल्या बच्चापार्टीसह सगळ्यांनाच पुन्हा एकवार आपआपल्या शाळेत नेऊन यथेच्छ फेरफटका मारून आणलं. शाळेतल्या जुन्या आठवणीं परत नव्याने ताज्या केल्या. आणि मनसोक्त पणे खेळाच्या मैदानात उतरवून “मधल्या सुट्टी” चा पुरेपूर आनंद लुटला …..

नेहमी प्रमाणे रजिस्ट्रेशन ची जबाबदारी लिनी आठवले, नीलम कुळकर्णी यांनी सक्षम रीत्या सांभाळली आणि नवीन पाहुण्यांना मंडळाची, वर्षभरात साजरे केले जाणाऱ्या कार्यक्रमाची माहिती सरोज जावकर यांनी पुरवली. मला इथं सांगायला खूप आनंद होतो आहे कि, या कार्यक्रमाला जवळजवळ आठ नवीन कुटुंबांनी आवर्जून भाग घेतला आणि मंडळाचे सदस्यत्व स्वीकारले. ह्या नवीन पाहुण्यांचे A2MM परिवारात स्वागत! सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी, युथ कमिटीसह सीमा बिलगी-फडणीस आणि युगंधरा देशपांडे यांच्या अत्यंत रेखीव अश्या रांगोळीने पाहुण्यांचं स्वागत केलं आणि त्याचप्रमाणे हॉलच्या अतिशय मोहक अश्या सजावटीस हातभार लावला.

या कार्यक्रमाची एक विशेष खासियत म्हणजे ह्यावेळी प्रथमच युथ कमिटीच्या सहकार्याने, एक नवीन उपक्रम राबवला गेला. सध्या अतिशय प्रचलित असलेल्या FIT-BIT किंवा यासारख्या दुसऱ्या कुठच्याही Activity Tracker/Pedometer/Smart Phone द्वारे, या खेळांत भाग घेऊ इच्छिणाऱ्या उपस्थितांच्या, कार्यक्रमाच्या “आधी” आणि कार्यक्रमाच्या “शेवटी” स्टेप्स ची नोंद करण्यात आली. जास्तीत जास्त steps ची नोंदणी झालेल्या स्पर्धकांचे मंडळातर्फे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. ह्या स्टेप्स चॅलेंज मध्ये चिन्मय देवरे, प्राची चोरडिया आणि अरविंद भोसले ह्या खेळाडूंनी बाजी मारली. ह्या नवीन उपक्रमांत युथ कमिटीच्या नील मराठे, मीरा कानडे,आणि चिन्मय देवरे यासर्वांचं मौलिक सहकार्य लाभलं. लहान-मोठ्या सगळ्याच वयोगटातील जवळजवळ एकूणएक स्पर्धकांनी जास्तीत-जास्त संख्येने ह्या खेळात भाग घेऊन, ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही एक “प्रोत्साहन-रुपी-अपेक्षा” होती.

मग, बाळ-गोपाळ मित्र मंडळ म्हणजे बच्चा पार्टीने “PB & J”, कुकीज, बिस्कीटं तर मोठ्या मंडळींनी चविष्ट काकडी-चटणी सँडविच, चहा-कॉफी, थंडगार पन्ह्याचा आस्वाद घेत, सगळ्या मैदानी खेळांची दणक्यात सुरुवात झाली. प्रामुख्याने ह्या ” बालविहार(kids)”, “झेपतंय का?-(adult/youth)”, “जरा दमानं!-(adult/youth)”- तीन वेगवेगळ्या वयोगटात स्पर्धकांच्या वयानुसार विभागणी केली गेली. मघाशी म्हंटल्या प्रमाणे, अमित आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी,सर्वप्रथम आयोजित खेळांचे नियम व्यवस्थितपणे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. तर आपले हौशी आणि उत्साही “Recess Monitors” म्हणजे बालविहार(kids) गटासाठी रेश्मा उपासनी, रमा ठाकर, पराग देवतारे, त्याचप्रमाणे झेपतंय का?(adult/youth) – गटासाठी रणजीत सप्रे, रोहित जातेगांवकर, विद्येश कामत आणि जरा दमानं! (adult/youth) – गटासाठी अरविंद भोसले आणि देवदत्त शेंडे ह्यांनी विविध खेळांचं सूत्रसंचलन करून, ह्या कार्यक्रमाची रंगत वाढविली. एका वेळी प्रत्येक खेळाच्या, वेग-वेगळ्या वयोगटाच्या फेऱ्या खेळल्या गेल्या. आणि ही खऱ्या अर्थाने “मधली सुट्टीच” असल्याने बक्षिस समारंभासारख्या औपचारिकतेस काही खास वाव नव्हताच. पण तरीही फुल ना फुलाची पाकळी म्हणून अंतिम फेरी विजेत्यांना शक्तिवर्धक Cliff Energy Bar Packs वाटण्यात आले. आणि विशेष म्हणजे, इतर खेळांप्रमाणेच लहानग्यांची “संगीत खुर्ची” देखील विशेष रंगली. त्यांच्या संगीत खुर्चीच्या संगीतावर अमिताभ मुदिराज सह विशेषतः सगळ्या स्त्री-स्पर्धकांनी फेर धरला आणि Aerobics करून जास्तीत जास्त स्टेप्स आपल्या खात्यात जमा केल्या.चुरशीचे,अटीतटीचे सामने रंगले आणि खेळून दमल्यावर, सगळ्यांना चांगलीच सपाटून भूक लागली.

नेहेमीप्रमाणे स्वाती कुळकर्णी, दिप्तीताई शारंगपाणी, संजू पालेकर, जान्हवी चौबळ, ऋता सिंग,पल्लवी सप्रे, सोनाली मोहिले, माधुरी देशपांडे आणि विभा शेंडे ह्या सगळ्या जणींनी मिळून केलेल्या खास घरगुती स्वयंपाकावर म्हणजे वाटली डाळ, तिखटं -मिठाच्या पुऱ्या, कोशिंबीर, चुंदा, व्हेज – बिर्याणी यांवर भरपेट ताव मारला. स्वीटडिश म्हणून अगदी शाळेंत गाडीवर मिळायचं तसं छोट्याश्या कपातलं, इवल्याश्या लाकडी चमच्याने “आईस्क्रीम” खाऊन मंडळी तृप्त झाली. असो.

तशी काही खास इच्छा नव्हती पण वेळेअभावी कार्यक्रम आटोपता घेणं भाग होत. तेव्हा पियुष करकरें सह मेधा करकरे,अंजली पटवर्धन, मंदार देशपांडे, भूषण कुलकर्णी, लौकिक देशपांडे, अजित कुलकर्णी, देवदत्त शेंडे आणि अनंता सापळे इ. मंडळींनीं सामानाची आवराआवार, कार्यक्रमानंतरच्या साफसफाईस मदत केली. आणि कार्यक्रमाची सांगता झाली. ह्या सगळया खेळीमेळीच्या वातावरणातल्या सुखद आठवणी जतन करता याव्या म्हणून युथ कमिटीने एक छान “फोटोफ्रेम” सजवली होती. ह्या फ्रेमसोबतच्या छायाचित्रांद्वारे ह्यादिवशीच्या गोड आठवणी टिपल्या.. ह्या सगळ्या उत्साही कार्यकर्त्यांच्या, सभासदांच्या मैलिक सहकार्यामुळेच, सर्व उपस्थित मंडळी ह्या कार्यक्रमाचा आनंद उपभोगूं शकले. इथं सगळ्यांची नांवे लिहिणं शक्य नाही पण तरीसुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्यास लागणारी कुठल्याही प्रकारची मदत किंवा सहकार्य, जर अनवधानाने नमुद करायचे राहीले असेल तर, मोठ्या मनाने तुम्ही मला माफ कराल, यात शंका नाही.

आपल्या या मंडळाचा कुठलाही कार्यक्रम असो, तो यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वच कार्यकर्ते खूप मेहनत घेतात. काहीतरी नवीन करायचं अशी द्रुढ भावना सगळ्यांची असतेच आणि त्याचबरोबर “करमणूक” हा एक मुख्य हेतू असतो. विशेषतः ह्या कार्यक्रमाच्या कल्पक नावासह, संकल्पना आणि पूर्णतः वेळेचं भान ठेवून संपूर्ण आयोजनाचे श्रेय विशेषतः प्रोग्रॅम मॅनेजर अमित उपासनी त्याचप्रमाणे अनंता सापळे व देवदत्त शेंडे ह्यांनाच द्यावं लागेल. एक गोष्ट मात्र नक्की …प्रत्येक स्पर्धकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच “निरागस” बालपण अनुभवल्याचं समाधान झळकलं, पुन्हा एकदा शाळेच्या सोनेरी आठवणी उजळल्या …. लहान-मोठ्या सर्वच उपस्थितांच्या समाधानाची,आनंदाची आणि ह्या कार्यक्रमाच्या यशाची हिच खरी “पावती”!

तर मंडळी, तुमच्या या मैत्रीची साथ यापुढेही अशीच कायम असू दया. नव्या वर्षात, नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या …. फिर मिलेंगे…. और मिलते रहेंगे!

सौ.सरोज प्रशांत जावकर
A2MM Marketing Team

Gudhi Padawa 2018